Sun. Oct 12th, 2025

कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा  प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जामठा परिसरातील स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, पर्नो रिका इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, अनेक संस्थांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. तथापी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ज्या संवेदनशीलतेने कॅन्सर रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देत उपचार केले जातात ती भावनिक आपुलकी इतरत्र कमी आढळते. येत्या काळात देशातील सर्वात चांगल्या संस्थेमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी व्यक्त केला.

ज्या संस्थेमध्ये सेवाभाव असतो तसेच समाजात कुणीही दुःखी राहू नये ही भावना उराशी जपणारे सहकारी असतात त्या संस्था लोकांना अधिक भावतात. लाखो नागरिकांच्या दुःखात सहाय्यभूत होण्याचा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. हा विचार खूप कमी लोकांमध्ये दिसून येतो या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅन्सर इन्स्टिट्युटचा गौरव केला.